औरंगाबाद- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात इच्छूकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या व्यक्तींना ही निवडणूक लढविता येणार नसल्याने अशांची अडचण झाली आहे. अशाच एका व्यक्तीने शहरात ठिकठिकाणी बॅनर लावून महापालिका निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे, असे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. सध्या या बॅनरची शहरभर चर्चा आहे.
शहरातील गुलमंडी, औरंगपुरा यासह इतरही काही भागात हे बॅनर लागल्याचे शहरवासीयांच्या नजरेस पडले. तेव्हापासून या बॅनरचे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहेत. या बॅनरवर एका व्यक्तीचा फोटो असून त्याखाली रमेश पाटील असे नाव आहे. मनपा निवडणूक २०२२, मला तीन मुले असल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही, निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे, असा मजकूर आहे. जातीची अट नाही असा उल्लेखही त्याखाली आहे. त्याने केलेल्या या बॅनरची परिसरात व सोशल मीडियावर चर्चा सूरू आहे.