बातम्या शेअर करा

गुहागर – कोकणातील महत्त्वपूर्ण अशा गुहागर विधानसभा मतदार संघात सध्या संगमेश्वरी पेटाऱ्याची खुमासदार चर्चा सुरु आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा पेटारा संगमेश्वरमधून गुहागरच्या दिशेने निघाला होता. मात्र तो पालवणमध्येच अडकला असल्याचे गुपित एका धनुर्धारी नेत्याने नुकतेच उघड केल्याने गुहागर मतदार संघातील मतदारांमध्ये या ‘पेटाऱ्यात एवढं दडलंय काय’ याबाबत उत्सुकता वाढली आहे. हा पेटारा एकीकडं मतदार संघात न उघडताच तो मात्र समाजाच्या नावाखाली घड्याळाची टिकटिक गावागावातील समाजबांधवांकडे ऐकू यावी यासाठी पायघड्या घालत असून समाज त्या पायघड्यांना कितपत स्विकारणार हे येणाऱ्या निवडणुकीतच समजेल.

गुहागर विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या प्रचारात सध्या मोठी रंगत आली आहे. विवंचनेत असलेल्या ‘वंचितां’ ची फारशी चिंता न करता ‘मनसे’ (मनाप्रमाणे) प्रचार करणाऱ्या या उमेदवारांचा मागमुसही प्रचारात जाणवत नसल्याने सध्यातरी दोनच प्रमुख पक्षांमध्ये सरळसरळ लढत होणार असे दिसत आहे. मात्र घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या पक्षाकडून अद्यापही आरोपांच्या फैरी झडताना दिसत नाहीत. याचवेळी हाती शस्त्र घेतलेल्या ‘त्या’ धनुर्धारी नेत्याने दसऱ्याच्या दिवशीच आपली पारंपरिक शब्दांची शस्त्रे बाहेर काढून विरोधी पक्षाच्या उमेदवारावर वार करणे सुरु केले आहे. मतदार संघात त्यांच्या ठिकठिकाणी होणाऱ्या सभा बैठकांतून याचे प्रत्यंतर येत आहे. या बैठकांमधून संगमेश्वरी पेटाऱ्याचे रहस्य उलगडले जात असून मतदारांमध्ये त्याबाबत तपशीलवार जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

आगऱ्याहून सुखरूप सुटका करून घेण्यासाठी शिवाजी महाराज पेटाऱ्यातून पसार झाल्याचा इतिहास आजही आपण अभिमानाने सांगतो. मात्र तो पेटारा सुरक्षिततेचा व ते वाहून नेणाऱ्या सैनिकाच्या साहसाचा होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र आता एका वेगळ्याच पेटाऱ्याची खुमासदार चर्चा गुहागर मतदार संघात सुरू आहे.

हा पेटारा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या संगमेश्वरमधून निघाल्याची बातमी पसरली आहे. यावर एका ठिकाणी झालेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या काही जाणकार मतदारांनी हा पेटारा कोजागिरी पौर्णिमेला पोचणार असल्याचे सांगितले. मात्र एका धनुर्धारी नेत्याने या पेटाऱ्याचे गुपित उघड केले.

या धनुर्धारी नेत्याच्या म्हणण्यानुसार त्याच्याविरुध्द लढणारी ही व्यक्ती भला मोठा पेटारा घेऊन निघाली आहे. मात्र सध्या तो पेटारा सावर्डा ते आबलोली दरम्यान एका नेत्याच्या घरात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तो गुहागरमध्ये येईल का नाही, याची शंकाच असून त्याचा उपयोग संगमेश्वरी इलाख्यातच होईल. त्यातून हा पेटारा गुहागरमध्ये आलाच तर तो इथे रिकामा होईल व त्यातूनच हे पराभवाचे पार्सल संगमेश्वरला पाठवून देण्यात येईल, अशा आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीत या नेत्याने थेट शरसंधानच केले. यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या काही मतदारांमध्ये हशा पिकला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here