बातम्या शेअर करा


गुहागर – आज गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील सी व्ह्यु गॅलरींवर बेकायदेशीरतेचा ठपका ठेऊन हरित लवादाच्या आदेशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या जमीनदोस्त केल्या.

बेकायदेशीर बांधकामांवर निश्चितच कारवाई झाली पाहिजे असे मानणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांपैकी मी देखील एक असलो तरी आज दिवसभरात घडलेल्या घटनेने मी देखील विचलित व निराश झालो आहे. गुहागरशी नाळ जोडलेल्या व कोणत्याही राजकीय पक्षाशी काडीमात्र संबंध नसलेल्या माझ्यासारख्या अनेक गुहागरवासियांच्या मनात आज निश्चितपणे दुःखाची व निराशेची भावना असेल यात मला कोणतीही शंका वाटत नाही.
मासेमारी, माडी व्यवसाय व पर्यटन हे गुहागर शहर व परिसरातील गावांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन मानले जाते. त्यातल्या त्यात पर्यटन व्यवसाय हा सर्वसमावेशक असल्याने पर्यटन वाढीवर अधिक भर देणे गरजेचे होते व यापुढेही राहील. मागील काही वर्षांचे निरीक्षण केले तर मागच्या दहा वर्षापासून गुहागरमध्ये पर्यटन व्यवसायाला अधिक बळकटी आली हे सर्वांना मान्य करावे लागेल. सर्वात स्वच्छ, सुरक्षित व विलोभनीय असा समुद्रकिनारा गुहागरला लाभला असला तरी गुहागरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या तुरळकच असायची. गुहागरमध्ये नगरपंचायत आल्यानंतर त्या माध्यमातून निर्माण झालेला निधी व त्या निधीतून गुहागरमध्ये दृश्य स्वरूपात पर्यटन विकासाला आवश्यक असलेली झालेली विकास कामे ही नजरेआड करून चालणार नाहीत. शहरातील तलावांचे सुशोभीकरण, शहरांमध्ये लावण्यात आलेले पथदीप, काही मोजक्या ठिकाणी व समुद्रकिना-यावर लावण्यात आलेले हायमॅक्स दिवे, सी व्ह्यु गॅलरीज् व जेटी यामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडली हे कोणताही सर्वसामान्य गुहागरकर नाकारणार नाही.
जसजशी गुहागरच्या सौंदर्यामध्ये भर पडत गेली तसतसे काही तासांकरता समुद्रावर फिरण्या करता येणारे पर्यटक अधिक वेळ काढून संध्याकाळच्या वेळीदेखील समुद्रकिनाऱ्यावर थांबू लागले. पर्यटनाच्या हंगामामध्ये बाजारपेठा गजबजू लागल्या. हॉटेल व लॉजिंग व्यवसायाला चांगले दिवस आले व त्याचाच परिणाम म्हणून गुहागरमध्ये घरोघरी उत्तम दर्जाच्या रहिवासाच्या सुविधा मिळू लागल्या. गुहागरमध्ये रोजगार वाढला तो केवळ पर्यटनाच्या दृष्टीने झालेल्या विकास कामांमुळेच.
गुहागरमध्ये जेटीचे बांधकाम झाल्यापासून त्याला राजकीय विरोध होत होता. काही काळानंतर जेटी समुद्राच्या पाण्यामुळे वाहुन देखील गेली व धोकादायक म्हणून तिचा वापर देखील बंद करण्यात आला. त्यावेळी जेटीचे बांधकाम व सी व्ह्यु गॅलरीज् चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले म्हणून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे असे सर्वांना वाटत होते व त्यामध्ये चुकीचे काहीच नव्हते. परंतु जेटी व सी व्ह्यु गॅलरीज् पूर्णपणे पाडूनच टाकाव्यात असे कुणालाच वाटत नव्हते. त्यांची डागडुजी करून त्या पुन्हा मूळ स्वरूपात आणाव्यात असेच सर्वांना वाटत होते.
पर्यटन वाढीतून नवीन रोजगार उत्पन्न होऊन शहरवासीयांचे जीवनमान उंचावणार असेल आणि गुहागर ही देवभूमी व पर्यटन क्षेत्र म्हणून ठळकपणे जगाच्या नकाशावर येत असेल तर थोड्याफार प्रमाणात केलेली बेकायदेशीर बांधकामे देखील समर्थनीय आहेत असे माझे वैयक्तिक पण स्पष्ट मत आहे.
आजचा दिवस गुहागर वासियांसाठी निराशाजनक ठरला आहे. गुहागरचा पर्यटन व्यवसाय वाचवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन संघटित होऊन काम करणे गरजेचे आहे. आजच्या घटनेमुळे गुहागरच्या पर्यटनाला फार मोठे नुकसान सोसावे लागले आहे आणि गुहागरचा पर्यटन व्यवसाय दहा वर्ष मागे गेला आहे हे मात्र तितकेच खरे.
गुहागरच्या आत्ताच्या सत्ताधारी नगरसेवकांनी एकत्र येऊन गुहागरच्या पर्यटन विकासाला चालना देणारे एक शाश्वत मॉडेल तयार करावे व त्याची अंमलबजावणी करावी हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

ॲड. संकेत साळवी.
सर्वसामान्य गुहागरकर.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here